पुस्तकगाडीतील एक दिवस

Written by Pramod Kamble

पुस्तकगाडी (फिरते ग्रंथालय) हा प्रकल्प आदिवासी विकास विभाग व क्वॉलीटी एज्यूकेशन सपोर्ट ट्रस्ट यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील दहा आश्रम शाळांमध्ये राबवविला जातो. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व वाचन संस्कृती रुजविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाद्वारे मुलांना असंख्य गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देणे, उत्तम पद्धतीने वाचून दाखविणे, त्यावर आधारीत लेखन करण्यास प्रोत्साहन देणे, तसेच बालसिनेमे दाखविणे या सारखे उपक्रम घेतले जातात. 

शाळेच्या इमारतीत स्वतंत्र ग्रंथालयाच्या खोलीची व्यवस्था नसते. बहुतेक सगळ्याच आश्रम शाळेतील मुलांची रहाण्याची व्यवस्थाही शाळेतील वर्गातच असते. आजारी मुलं वर्गातच मागील बाजूस झोपलेली असतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसते. वर्गामध्येच मुलांच्या सामानाच्या पेट्या असतात. बऱ्याच वेळेस पेट्या तुटक्या असतात. त्यांना कुलूप लावण्याची सोय देखील नसते. मुलांना वह्या, पुस्तके, कपडे शाळेकडूनच मिळतात. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांखेरीज अन्य पुस्तके त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे आम्ही नेत असलेली गोष्टीची पुस्तके परत न देता मुले स्वत:जवळ ठेवून घेतील आणि त्यामुळे काही पुस्तकं गहाळ होतील हे आम्ही गृहीत धरून चाललो होतो.

 

सोमवारी साकूर कन्या आश्रमशाळेत पोहचता-पोहचता १२.३० झाले. मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो असता नेहमीप्रमाणे ते मिटींगसाठी जव्हारला गेल्याच कळलं. कार्यालयातील शिपायाजवळ सरांकरिता निरोप ठेवला आणि नियोजना प्रमाणे मी पाचवीच्या वर्गावर गेलो. हजेरी घेणं चालू केलं, अचानक माझं लक्ष दाराकडे गेलं. दोन मुली दारात उभ्या होत्या. मी त्यांना आत येऊन बसायला सांगितल्यावर लगेचच वर्गातील मुलींकडून उत्तर आलं की, “ते पाचवीच्या नाय सातवीच्या हाहेत.” मी त्यांना येण्याचं कारण विचारलं तर त्या काहीच बोलल्या नाहीत. मी जागेवरून उठलो व त्यांच्याजवळ जाऊन पुन्हा तोच प्रश्न विचारला. पुन्हा तेच, दोघी ढिम्म, काहीच उत्तर नाही. मी पुन्हा विचारलं “बरं वाटत नाही का?  झोपायचे आहे का? पेटीतून काही सामान काढायचे आहे का?” असं विचारलं अनं बोलता-बोलता त्या मुलीचे नाव चमसरा असल्याच मला आठवलं. पुन्हा मी बोललो “काय झालं चमसरा?” तसं ती धीर करून म्हणाली “सर आमचे वर्गावं ये”. ‘यांचे झालं की तुमच्या वर्गावर येतो’ असं आश्वासन देऊन दोघींना पाठवले. पाचवीच्या वर्गात काम करताना वेळ कसा गेला तेच कळलं नाही. घंटा वाजल्यावर जेवणाची सुटी झाल्याचं आणि दोन वाजल्याच लक्षात आलं. दुपारचं जेवण आटपून गाडीत पुस्तक वाचत बसलो होतो. या सगळ्या गडबडीत चमसरा प्रकरण विसरून गेलो होतो. घंटा वाजली, सुटी संपली, शाळा भरली. सुटी संपल्यावर मुली वर्ग झाडून साफ करतात त्यामुळे आणखी थोडावेळ हाताशी होताच म्हणून स्वस्थपणे पुस्तक वाचतं गाडीत बसून होतो. कानाशी आवाज आला “ सर आमच्याव ये” मी पुस्तकातून डोकं बाहेर काढून पाहीलं तर पुन्हा चमसरा. मी हसलो आणि बोललो “जा वर्ग झाडून साफ करा, मी येतोच.” चमसरा बोलली “सर झाडेल” (सर झाडला आहे)  थोड्या आश्चर्यानी मी म्हणालो “झाडला ? बरं ठीक आहे. व्हा पुढे, मी येतोच”.  मला गाडीतून पुस्तकं, लेसनप्लान, हजेरी रजिस्टर शोधायला थोडा वेळ गेला, तोपर्यंत त्या जवळच घुटमळत होत्या. सगळं सामान घेऊन मी वर्गाच्या दिशेने चालू लागलो. त्या मा‍झ्यासोबतच चालत होत्या.

सातवीच्या वर्गात पोहचलो, हजेरी झाली. मागील वेळेस अर्धे वाचलेलं पुस्तक वाचून पूर्ण केलं. पुस्तकातील विषयाला धरून झाडे नष्ट झाली तर काय होईल या विषयावर चर्चा चालू केली पण मुलींचा फारसा सहभाग दिसत नव्हता, त्यांची कसली तरी चुळबुळ चालू होती. न राहून चर्चा बंद करीत मी विचारलं “काय झालं.” एक मुलगी बोलली “सर पुस्तका.” “पुस्तकांच काय?” मी विचारलं. “भासलेली पुस्तका” (हरवलेली पुस्तकं) हातात ८-१० पुस्तक घेऊन उभी राहत चमसरा बोलली. मी पुढे जाऊन पुस्तक हातात घेत विचारलं, “सापडली तर पुस्तकं ”. आठवड्या भराच्या गडबडीत विसरून गेलेलं मागच्या सोमवारचं पुस्तक प्रकरण मला आठवलं.

  दयानंद सोबत पुस्तकांचे ऑडीट करायला आलो होतो त्या वेळेस लक्षात आलं की सातवीच्या वर्गातून १२ पुस्तकं परत आली नाहीत. मी थोडासा चिडूनच वर्गात गेलो आणि ज्या मुलींनी पुस्तक परत दिली नहीत त्यांना उभं केलं. पुस्तकं न परतवण्याचं कारण विचारलं. सगळ्यांकडून एकच उत्तर “भासलं” (हरवलं). हरवलेल्या पुस्तकाची किंमत अथवा दंड घेणं हा पर्याय माझ्याजवळ उपलब्ध नव्हता. मुलींना घडलेल्या घटनेचे गांभिर्य लक्षात आणून देणे गरजेच होतं. मुलीं जवळील सगळी पुस्तकं जमा केली व त्यांना सांगीतलं हरवलेली पुस्तकं मिळाली नाहीत तर त्यांची किंमत मला भरावी लागेल. माझे नुकसान होत असेल तर यापुढे कोणालाच पुस्तक वाचायला देणार नाही आणि तुमच्या वर्गावर देखील येणार नाही असे त्यांना सहजच सांगीतले.

गेल्या वर्षभरात दहा ते बारा वेळा पुस्तक देवघेव प्रक्रिया सर्व शाळांतील मुलांसोबत झाली होती. कार्यक्रमाच्या सुरवातीच्या दोन महिन्यांत पाचवी, सहावी आणि सातवी इयत्तेच्या वर्गातील मुलांना प्रत्येक भेटी दरम्यान एका तासिके पुरती पुस्तकं वाचायला देऊन परत घेतली जात. हळूहळू मुलांना पुस्तकांची आवड निर्माण झाली व ती पुस्तकं ठेवायला मागू लागली. मुलांना पुस्तक देण्यापूर्वी त्यांची काळजी कशी घ्यावी, कशा पद्धतीने हाताळावे यासारख्या सूचना वारंवार दिल्या गेल्या. पुस्तकं तुमच्यासाठीच आहेत, जपून वापरली तरचं ती मागे शिकत असलेल्या तुमच्या बहीण-भावंडांना वाचायला मिळतील याचीही जाणीव करूण देण्यात आली. मुलांकडून पुस्तकं नीट वापरली जातील असे आश्वासन मिळाल्यानंतरच मुलांना पुस्तकं ठेवायला देण्यात येऊ लागली.

क्वचित आश्रमी मुलांकडील एखाद दुसरे पुस्तक हरवल्याचं किंवा पेटीचे कुलूप तोडून चोरी झाल्याच्या घटना घडत. पण मुळ समस्या दुसरीच आहे असं नंतर आमच्या लक्षात आलं. आश्रमशाळेत एका वर्गात ८० ते १०० मुलं असतात. उपलब्ध जागेची व्यवस्था पहाता सगळ्याच मुलांची शाळेत रहाण्याची सोय करता येत नाही. जवळच्या गावतील, पाड्यातील मुलं अशा परिस्थितीत घरून ये-जा करतात. या मुलांना डे-स्कॉलर म्हणतात. डे-स्कॉलर मुलांना घरी न्यायला दिलेली पुस्तक हरवल्यामुळे किंवा फाटल्यामुळे परत मिळत नाहीत. अशा मुलांकडून हरवलेल्या पुस्तकांची संख्या मोठी होती असे पुस्तक देवघेव रजीस्टर तपासल्या नंतर कळाले.

आता मा‍झ्या लक्षात आलं की चमसरा मी आल्या पासून सारखी का माझ्या मागे लागली होती ते. हाततील पुस्तकं मोजली. ती १० होती. पुस्तक देवघेव रजिस्टर मध्ये ती मिळाल्याची नोंद केली पण अजूनही २ पुस्तके परत आली नव्हती. त्याबद्दल मुलींशी बोललो तर त्या म्हणाल्या, ”भासेल पुस्तकाचं पैसं आमी देव, पन वर्गावं इजोस हो” (हरवलेल्या पुस्तकांचे पैसे आम्ही देतो. पण आमच्या वर्गात या.) मी होकार दिला आणि बाहेर निघालो.

आश्रमशाळेतील पुस्तेक नेहमी कपाटात ठेवली जातात आणि त्या मागे एक उत्तर ऐकायला मिळते  ते म्हणजे मुले पुस्तके फाडतात. म्हणजे अप्रत्यपणे मुलांना पुस्तकांची किंमत कळत नाही असं खरं तर त्यांच म्हणणं असतं. पण या निमित्ताने का होईना वरिल म्हणण्याला काही पाठींबा मिळत नाही. उलट पुस्तकांची आवड मुलांमध्ये निर्माण झाली तर ती पुस्तकांची काळजीही घेतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव असते हेच या प्रसंगातून दिसून येते.   

 

                                                                 प्रमोद कांबळे

Pramod Kamble works with Quality Education Support Trust (QUEST), Maharashtra and is a participant in the Library Educators’ Course (Hindi batch), 2017.

2 thoughts to “पुस्तकगाडीतील एक दिवस”

  1. Dear Pramod – really enjoyed reading the blog and could picture the day in front of my eyes, and shy Chamsara you capture through your writing. Thank you for penning this. I was really moved and a bit shaken to read the response of Chamrasa saying that they will pay for the lost book cost (instead of you having to do it), but you should not stop coming to their class? I missed reading your response to that in the blog.
    Few questions I had: Looking back and also from the LEC lens, if this kind of situation were to occur again, would your response to children be different? I mean, do you think telling the class that if books are not found, you will not go to their class (when did you did not intent do follow that) is right thing to do? Could there be other ways to communicate need to care for books, take responsibility of books without such a threat?
    Look forward to a dialogue and understanding your reflections.
    Amrita

  2. It was great seeing you practicing your learning at the field and sharing it with all. Though i could not understand the write up in Marathi but could feel it as i have experienced it face to face at QUEST. Wish you all the best and keep it up!!!!!

    Cosmos Joseph from Aide-et-Action Bhopal

Leave a Reply